सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : भाजपकडून जागावाटपाचे सूत्र ठरविण्याची ‘या’ दोघांवर जबाबदारी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील तीनही पक्ष एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. भाजपने सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार धैर्यशील कदम यांच्यावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून जागावाटपाचा तिढा सोडवण्याची जबाबदारी सोपवली आहे. येत्या रविवारी, ११ ऑक्टोबरला महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवडाभरापासून महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. तीनही पक्षांनी आपापली भूमिका मांडली असली, तरी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि धैर्यशील कदम यांनी विविध नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याची माहिती आहे. आता सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र घेऊन अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्याची तयारी सुरू आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या ११ जागा वगळता उर्वरित १० जागांचे वाटप महायुतीतील घटक पक्षांमध्ये केले जाणार आहे. हे वाटप ठरावांच्या प्रमाणात व्हावे, यावर तीनही पक्षांचे एकमत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षांच्या ठरावांमध्ये फारसा फरक नसल्याने जागावाटपाचा निर्णय लवकर होईल आणि तो सर्वांना मान्य असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी भूमिका असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले. आपण दोन दिवस गुजरातमध्ये होतो, तर मंत्री मकरंद पाटीलही बाहेर असल्याने अंतिम निर्णयासाठी सर्व नेत्यांची बैठक रविवारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याआधी प्राथमिक स्तरावर सर्वांशी चर्चा करण्यात आली आहे.
आता ११ ऑक्टोबरच्या बैठकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठरावांच्या संख्येच्या आधारे जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होतो का आणि महायुतीतील तिन्ही पक्ष या निर्णयावर एकमत साधतात का, हे बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

INFO सोलापूर –प्रतिनिधी नोंदणी










