माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे बँकेने कर्जवसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलेल्या लॉज आणि बिअर बारचे कुलूप व लाखेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामदास आबासाहेब देशमुख, शुभांगी रामदास देशमुख आणि अन्य एकाविरुद्ध वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मालमत्तेवर बँकेचे सुमारे ४४ लाख रुपयांचे कर्ज थकीत होते.
रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड, मंगळवेढा शाखा नातेपुते येथून माळशिरस येथील रामदास आबासाहेब देशमुख आणि शुभांगी रामदास देशमुख यांनी मालमत्ता तारण ठेवून ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी वेळापूर, ता. माळशिरस येथील गट क्रमांक १२१०/२/अ मधील मालमत्ता क्रमांक ६७०, एकूण १६०० चौरस मीटर क्षेत्रावरील लॉज, बिअर बार आणि त्यासमोरील गाळे बँकेकडे गहाण ठेवण्यात आले होते.
मात्र, दीर्घकाळ कर्जाचे हप्ते भरले गेले नाहीत. त्यामुळे बँकेने कर्जवसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. वित्तीय मालमत्तेचे संपादन व पुनर्रचना आणि तारण हक्काची अंमलबजावणी कायदा २००२ (SARFAESI Act) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
‘आमचे गाव दिवाळखोरीत निघाले, दिवाळी कशी साजरी करायची?’; तुळशी गावच्या मदतीला आमदार सुभाष देशमुख धावले, शिरपूर पॅटर्नच्या कामाला सुरुवात!
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बँकेने घेतला ताबा
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २१ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित मालमत्तेचा ताबा घेण्यात आला. यावेळी वेळापूरचे मंडळ अधिकारी एस. टी. चव्हाण, बँकेचे CEO ब्रह्मे, प्राधिकृत अधिकारी दीपक अदोने आणि विशेष वसुली अधिकारी बसवराज सलगरकर उपस्थित होते.
मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर संपूर्ण इमारतीला कुलूप लावण्यात आले. तसेच चिकटपट्टी लावून लाखेचे सील मारण्यात आले. बँकेने कायदेशीर प्रक्रियेनुसार मालमत्ता ताब्यात घेतल्याने पुढील कारवाई होईपर्यंत तिचा ताबा बँकेकडे राहणार होता.
पाच दिवसांतच सील तोडल्याचे उघड
२६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास नातेपुते शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र माने संबंधित मालमत्तेची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मालमत्तेवरील कुलूप आणि लाखेचे सील तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेत अनधिकृत प्रवेश झाल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
वसुली अधिकाऱ्यांची पोलिसांत तक्रार
या प्रकारानंतर बँकेचे प्राधिकृत अधिकारी दीपक अदोने यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून रामदास आबासाहेब देशमुख, शुभांगी रामदास देशमुख आणि बाळासाहेब देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुळवरून फडणवीस सरकारची कोंडी! भूषण गवईंचा प्रतिकूल अभिप्राय; चार तज्ज्ञ संचालकांच्या मतदानाचा अधिकार न्यायालयीन कसोटीवर?
बँकेने कायदेशीर प्रक्रियेद्वारे ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचे सील तोडल्याच्या आरोपामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास केला जाणार असून, सील तोडण्यामागील नेमकी परिस्थिती आणि संबंधितांची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.










