सोलापूर विशेष | आकाश शिंदे, प्रतिनिधी
सोलापूर : ऊसाला योग्य आणि परवडणारा दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऊस दरातील तफावतीवरून शेतकरी नाराज
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाला पहिली उचल ३,९०० रुपये जाहीर करण्यात आली आहे. त्याउलट सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून ३,००० ते ३,१५० रुपये दर जाहीर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या दरातील तफावत शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
नामांकित पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे जोरात, वसुलदाराची दिवाळी..वसुलदार मात्र तोऱ्यात..!
खते, मजुरी, मशागत, ऊसतोडणी आणि वाहतूक यांसह शेतीच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत जाहीर करण्यात आलेला दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. ऊस उत्पादकांना न्याय्य दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही संघटनेने व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला कारखानदारांची अनुपस्थिती?
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी साखर कारखानदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला एकही कारखानदार उपस्थित राहिला नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. कारखान्यांचे कार्यकारी संचालक आणि शेती अधिकारी बैठकीला उपस्थित होते, असे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला कारखानदारांनी उपस्थित न राहिल्याबद्दल शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. कारखानदारांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पक्ष, गट, तट बाजूला ठेवून सहभागी होण्याचे आवाहन
हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बँकेने जप्त केलेल्या लॉज-बिअर बारचे सील तोडले! ४४ लाखांचे कर्ज थकीत; देशमुख दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल
या मोर्चात एक लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे सोमवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#RajuShetti #SwabhimaniShetkariSanghatana #SugarcanePrice #FarmersProtest #Solapur #SolapurNews #InfoSolapur











