मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडीच्या आयुष थिटेचे अपघातानंतर निधन; दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कुटुंबीयांचा अवयवदानाचा निर्णय
सोलापूरच्या ९ वर्षीय आयुषचे अवयवदान; रशियन बालकासह ५ जणांना नवजीवन
मोहोळ | सोलापूर आपल्या पोटच्या गोळ्याला गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण असते. मात्र या असह्य दुःखाच्या क्षणीही सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामीण कुटुंबाने घेतलेला निर्णय समाजासाठी माणुसकीचा आदर्श ठरला आहे. मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी (अनगर) येथील अवघ्या ९ वर्षीय आयुष महेश थिटे याच्या अवयवदानामुळे रशियन बालकासह तब्बल पाच गंभीर रुग्णांना नवजीवनाची संधी मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी आयुष घरासमोरील रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला तातडीने सोलापूर येथील चंदन न्यूरोसायन्सेस हॉस्पिटल (CNS) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने आयुषला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचारादरम्यान त्याच्या मेंदूने प्रतिसाद देणे पूर्णपणे थांबले.
वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी आयुषला ब्रेन डेड घोषित केले. हसता-खेळता एकुलता एक मुलगा आता पुन्हा कधीच उठणार नाही, हे सत्य स्वीकारणे थिटे कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी होते. आई-वडिलांसह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
याच अत्यंत कठीण प्रसंगी रुग्णालयातील डॉक्टर आणि अवयवदान समन्वयकांनी कुटुंबीयांशी संवेदनशीलतेने संवाद साधला. आयुषचे अवयवदान केल्यास इतर गंभीर रुग्णांना जीवनाची नवी संधी मिळू शकते, याची माहिती कुटुंबाला देण्यात आली.
काळजावर दगड ठेवत आयुषचे वडील महेश थिटे आणि कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिली. आपल्या मुलाचे आयुष्य वाचवता आले नाही, मात्र त्याच्या अवयवांमुळे इतरांचे आयुष्य वाचू शकते, या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला.
“माझा मुलगा या जगात राहिला नसला तरी त्याचे अस्तित्व आणि श्वास दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहावेत,” या भावनेतून घेतलेला हा निर्णय उपस्थितांसाठीही भावनिक करणारा ठरला.
कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर वैद्यकीय यंत्रणा आणि प्रशासनाने अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया वेगाने सुरू केली. आयुषचे हृदय पुण्यातील रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले. त्यासाठी सोलापूर ते पुणे विशेष ग्रीन कॉरिडॉर आणि एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार, आयुषचे हृदय गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या तीन वर्षीय रशियन बालकावर प्रत्यारोपित करण्यात आले. एका भारतीय चिमुकल्याच्या हृदयाचे ठोके आता परदेशी बालकाच्या शरीरात सुरू झाल्याने या घटनेने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आयुषचे केवळ हृदयच नव्हे, तर यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडेही गरजू रुग्णांसाठी दान करण्यात आली. या अवयवांच्या प्रत्यारोपणामुळे सरकारी प्रतीक्षा यादीतील इतर गंभीर रुग्णांनाही जीवनाची नवी संधी मिळाली. अशा प्रकारे एका चिमुकल्याच्या अवयवदानातून एकूण पाच रुग्णांना नवजीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
आयुषच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून समाजातील अवयवदानाबाबतची जनजागृती वाढविणारा ठरू शकतो. मुलाच्या निधनाचे दुःख उराशी बाळगत असतानाही इतर कुटुंबांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचा निर्णय घेणे ही बाब निश्चितच समाजासाठी विचार करायला लावणारी आहे.
आयुषचे आयुष्य अवघ्या नऊ वर्षांत थांबले; मात्र त्याच्या अवयवांमुळे पाच कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा श्वास निर्माण झाला. थिटे कुटुंबाच्या या निर्णयातून दुःखाच्या क्षणीही माणुसकी जिवंत ठेवता येते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.







