माढा तालुक्यातील तुळशी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आता मार्गी लावण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. पाण्याअभावी गाव विक्रीला काढण्याची वेळ आल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडल्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी गावाला पाणी स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी शिरपूर पॅटर्न राबविण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही करण्यात आली आहे.
तुळशी गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार खोदाईच्या कामासाठी पोकलेन आणि हायवा मशीन पाठवण्यात आल्या आहेत. कामाला सुरुवात झाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. तुळशी गावात शिरपूर पॅटर्न राबवून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्याअभावी गावाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, ग्रामस्थांनी गाव विक्रीला काढण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त केली होती. ‘आमचे गाव दिवाळखोरीत निघाले आहे, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची?’ असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. ग्रामस्थांची समजूत घालत पुढील वर्षी तुळशी गावात धूमधडाक्यात दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केल्याचे देशमुख यांनी सांगितले.
बँकेने जप्त केलेल्या लॉज-बिअर बारचे सील तोडले! ४४ लाखांचे कर्ज थकीत; देशमुख दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल
चिंचणी गावाच्या यशस्वी प्रयोगाचा दाखला
पाणी व्यवस्थापनाच्या कामाबाबत बोलताना सुभाष देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाचा अनुभव सांगितला. गेल्या आठ वर्षांपासून या गावात काम सुरू असून, त्या गावाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. याच धर्तीवर आडाची वाडी गावाप्रमाणे तुळशी गावालाही राज्य पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिरपूर पॅटर्नमुळे पाणीटंचाईवर मात करण्याचा निर्धार
तुळशी गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावासाठी पाण्याचा आराखडा तयार झाल्यानंतर खोदाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत पाणी मुरवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, या दिशेने काम झाल्यास गावाला पाणी स्वयंपूर्ण करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.
ग्रामस्थांच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रत्यक्ष यंत्रसामग्री उतरवून काम सुरू झाल्याने तुळशी गावात आशा निर्माण झाली आहे. मात्र, या कामाचा प्रत्यक्ष परिणाम किती होतो आणि गावाला पाणीटंचाईतून कितपत दिलासा मिळतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
गोकुळवरून फडणवीस सरकारची कोंडी! भूषण गवईंचा प्रतिकूल अभिप्राय; चार तज्ज्ञ संचालकांच्या मतदानाचा अधिकार न्यायालयीन कसोटीवर?










