राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर युवती अध्यक्षपदापासून भाजपच्या युवती मोर्चाच्या नेतृत्वापर्यंत; सामाजिक कार्यातून सोलापूरमध्ये स्वतंत्र ओळख
सोलापूर | भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर युवती मोर्चाच्या अध्यक्षपदी किरण माशाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धनगर समाजातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, महिला व युवतींच्या संघटनात्मक कामाचा अनुभव त्यांच्या राजकीय वाटचालीत महत्त्वाचा ठरणार आहे.किरण माशाळकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर युवती अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून, स्त्रीशक्ती नारीशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिला आणि युवतींशी संबंधित विविध उपक्रम राबविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शहरातील महिला व युवतींमध्ये त्यांचे संघटनात्मक काम उभे राहिले आहे.महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांच्या माध्यमातून बालाजी सरोवर हॉटेल येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करून तुलनेने कमी कालावधी झाल्याने महानगरपालिका निवडणुकीत त्यांना नगरसेवकपदाचे पक्षाचे तिकीट मिळाले नाही.
त्यानंतर आता पक्षाने त्यांच्यावर सोलापूर शहर युवती मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.किरण माशाळकर यांचे वडील नारायण माशाळकर हे यापूर्वी नगरसेवक राहिले आहेत. राजकीय पार्श्वभूमीसोबतच महिला आणि युवतींचे संघटन उभारण्याचा अनुभव असल्याने आगामी काळात भाजपच्या शहरातील युवती संघटन मजबूत करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर युवती मोर्चाच्या अध्यक्षपदी किरण माशाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर युवती अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.










