पंढरपूरातून सर्वाधिक १८१ ठराव सोलापूर
प्रतिनिधी इन्फो सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांतून एकूण २१६५ ठराव दाखल झाले आहेत. बँकेवरील सत्ता मिळविण्यासाठी विविध राजकीय गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, ठरावांच्या आकडेवारीतूनही त्याची झलक दिसत आहे.

या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघ सर्वाधिक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून तब्बल १२४३ ठराव दाखल झाले आहेत. त्यामध्ये पंढरपूर तालुक्याचा सर्वाधिक वाटा असून येथे १८१ ठराव नोंदविण्यात आले आहेत. माढा तालुक्यात १७५, तर माळशिरस तालुक्यात १४१ ठराव झाले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यांतील सहकार क्षेत्रातील हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. इतर मतदारसंघांचाही विचार करता नागरी सहकारी बँका व पतसंस्था गटातून ६१७, सहकारी दुग्ध संस्था गटातून २२०, तर कृषी प्रक्रिया व पणन गटातून ८५ ठराव दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या आगामी सत्तासमीकरणात प्रशांत परिचारक केंद्रस्थानी म्हणून या सर्व मतदारसंघांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
दाखल झालेल्या ठरावांची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सहकार विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर सहाय्यक सहनिबंधक स्तरावर मतदार पात्रतेची छाननी करून प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीवर आक्षेप व हरकती नोंदविण्याची संधी दिल्यानंतर अंतिम मतदारयादी निश्चित होईल. आठ वर्षांनंतर होत असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
भाजपकडून बँक ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून, ठरावांची तालुकानिहाय आकडेवारी सत्तेच्या संभाव्य समीकरणांचा अंदाज देत आहे. मात्र, अंतिम मतदारयादी आणि निवडणुकीतील प्रत्यक्ष उमेदवारीनंतरच बँकेच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. मजमी तैयार करा









