हजारो मैल दूर परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर; ११ दिवस गणेशोत्सव, लेझीम-झांज पथक आणि भव्य महाप्रसादाने उत्सवाला रंगत
सुदान : जन्मभूमीपासून हजारो मैल दूर, परदेशात कर्मभूमी म्हणून राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या मातीशी असलेली नाळ जपली आहे. सुदान येथील केनाना शुगर कंपनी (Kenana Sugar Company) मध्ये कार्यरत भारतीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येत गणरायाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करून तब्बल ११ दिवस गणेशोत्सव साजरा केला. पूजा, आरती, महाप्रसादासोबतच पारंपरिक लेझीम आणि झांज पथकाच्या सादरीकरणामुळे परदेशी भूमीवर अक्षरशः महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडले.

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज सकाळ-संध्याकाळ बाप्पाची आरती, पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. आरतीनंतर भारतीय कर्मचाऱ्यांसह उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत होते. हजारो मैल दूर असतानाही ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने कंपनीचा परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.
या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचे प्रतीक असलेले लेझीम आणि झांज पथक. भारतीय कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत लेझीमचे विविध खेळ आणि झांज पथकाचे सादरीकरण केले. झांजेचा कडकडाट आणि लेझीमचा खणखणाट यामुळे सुदानच्या भूमीवर महाराष्ट्रातील उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
गणेशोत्सवामुळे कंपनीतील भारतीय कर्मचाऱ्यांमध्येही एकोपा आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ झाली. रोजच्या कामाच्या व्यापातून काही काळ बाजूला होत सर्व कर्मचारी एकत्र येत उत्सवात सहभागी झाले. घरापासून दूर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा गणेशोत्सव आपल्या कुटुंबीयांपासून आणि मायभूमीपासून दूर असूनही घरच्या वातावरणाची अनुभूती देणारा ठरला.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वांसाठी विशेष महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यानंतर आधुनिक ध्वनिव्यवस्थेसह पारंपरिक लेझीम आणि झांज पथकाच्या तालावर उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. नाचत-गाजत आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भारतीय कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
या उत्सवाबाबत बोलताना दादासाहेब सिरसट यांनी परदेशातील गणेशोत्सवाच्या आठवणी सांगितल्या. भारतापासून हजारो मैल दूर असलो तरी मनाने आपण कायम भारताशी जोडलेले आहोत. गणेशोत्सवामुळे सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना मायभूमीची आणि भारतीय संस्कृतीची जवळून अनुभूती मिळाली. बाप्पाच्या आगमनामुळे सुदानमध्येही घरच्यासारखे कौटुंबिक वातावरण निर्माण झाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनासाठी केनाना शुगर कंपनीतील भारतीय कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे मेहनत घेतली. उत्तम पाटील, समीर सेन, संतोष जोशी, नितीन निंबाळकर, सुखदेव गायकवाड, संजय शिंदे, बालाजी नकुले, पिंटू भोसले, किशोर साखरे, गणेश गायकवाड, जयदीप पाटील, मंगेश नवले, शहाजी आदलिंगे, राहुल गोरे, अप्पा याकूर, संगप्पा गुब्बेवार, नितीन नामदे, गणेश नामदे, अक्षय पवार, हुमायून पत्ते खान, मनेकेरीदादा, दादासाहेब सिरसट आणि चित्तळकर यांच्यासह सर्व भारतीय सहकाऱ्यांनी उत्सवाच्या आयोजनात सहभाग घेतला.
परदेशात राहूनही भारतीय सण, संस्कृती आणि परंपरा जपता येतात, हे या गणेशोत्सवातून पुन्हा एकदा दिसून आले. विशेषतः महाराष्ट्राच्या लेझीम आणि झांज पथकामुळे या उत्सवाला वेगळीच सांस्कृतिक ओळख मिळाली. भारतीय कर्मचाऱ्यांच्या या उपक्रमाची स्थानिक पातळीवरही उत्सुकतेने दखल घेतली जात असून, परदेशात राहून आपल्या संस्कृतीशी नाते जपण्याचा हा प्रयत्न कौतुकाचा विषय ठरला आहे.
केनाना शुगरमधील या ११ दिवसांच्या गणेशोत्सवाने ‘देश दूर असला तरी संस्कृती मनापासून दूर जात नाही’ हा संदेश दिला. कामानिमित्त परदेशात गेलेल्या भारतीयांनी एकत्र येत गणरायाच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा, भक्ती आणि उत्साह आफ्रिकेच्या भूमीवर पोहोचवला.









