सोलापूरच्या ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेला मिळणार नवी दिशा!
सोलापूर :शारीरिक मर्यादांवर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अभ्यासाच्या जोरावर मात करत इतिहास रचणारे सुजित शिंदे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या योजना शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. १०० टक्के दृष्टीहीन असतानाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) दिव्यांग प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी वर्ग-१ चे अधिकारीपद मिळवले आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात—किंबहुना महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका १००% दृष्टीहीन अधिकाऱ्याची इतक्या मोठ्या प्रशासकीय पदावर नियुक्ती झाली असून त्यांच्या या नियुक्तीमुळे सोलापूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या सकारात्मक बदलाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मूळचे सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या सुजित शिंदे यांचा हा प्रशासकीय प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे. डोळ्यांनी जग पाहता येत नसतानाही त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली. स्क्रीन रीडर्स, ऑडिओ टूल्स आणि डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने रात्रंदिवस अभ्यास करून त्यांनी एमपीएससीच्या अत्यंत कठीण परीक्षेत राज्यात अव्वल स्थान मिळवले. प्रशासकीय कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून फाइल्स व शासकीय कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी ते अत्याधुनिक वाचन तंत्रज्ञानाचा (OCR Reader) वापर करणार असून, प्रशासनाकडूनही त्यांना दैनंदिन कामकाजासाठी सहकार्य केले जात आहे.

गेल्या काही काळापासून सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा कारभार पार कोलमडला असून विविध योजनांची अंमलबजावणी, शाळांचे व्यवस्थापन आणि प्रशासकीय नियोजनात मोठा सावळागोंधळ उडाला होता. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. मात्र, प्रचंड अभ्यासू वृत्ती, प्रशासकीय शिस्त आणि संकटांवर मात करण्याची अफाट जिद्द असणारे सुजित शिंदे योजना शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्याने आता सोलापूरचा शिक्षण कारभार पुन्हा योग्य रुळावर येईल, असा ठाम विश्वास शिक्षणप्रेमी व नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी कामाला सुरुवात केली असून त्यांच्या कार्यशैलीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.












